रामचंद्र प्रतिष्ठानचा सैनिक कल्याण निधी सोहळा
रामचंद्र प्रतिष्ठान या संस्थेने सैनिकी कल्याण निधी अर्पण सोहळा `सिर्फ' (एसआयआरएफ - सोल्जर्स इंडिपेन्डेन्ट रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन) या संस्थेसाठी आयोजित केला. हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या शिवाजी पार्क येथील मादाम कामा सभागृहात आयोजित केला होता. त्यावेळी सिर्फ संस्थेच्या संचालिका सुमेधा चिथडे, पेण (रायगड) येथील प्रख्यात शिक्षिका सुलभाताई अनंत लोंढे-जोशी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे, पेणच्या नगरसेविका तेजस्विनी नेने, समाजसेविका रिमा सावंत आणि शैला साठे तसेच रामचंद्र प्रतिष्ठान संस्थापक विश्वस्त नयना शिंदे आदीं मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सैनिकांच्या कार्याची जाणीव प्रत्येक भारतीयांमध्ये असायलाच हवी, विशेषतः नव्या पिढीत ती अधिक रुजवणे गरजेचे आहे, असे विचार सुमेधा योगेश चिथडे यांनी व्यक्त केले. क्रांतिकार्यात ज्यानी आपले सर्वस्व दिले, त्यांची माहिती शालेय अभ्यासक्रमात प्रकर्षाने आली पाहिजे, त्याचबरोबर प्रत्येक नागरिकांनी आपल्या जीवनातील थोडेफार कार्य किंवा समर्पण हे देशासाठी लढणा-या सैनिकांसाठी केले पाहिजे, असे विचार सुलभाताई लोंढे यांनी व्यक्त केले. स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांंचे सैनिकीकरण तसेच राष्ट्रभक्तीचे विचार समजून त्यानुसार आपला अधिक वेळ देशभक्तीसाठी द्यावा, असे आवाहन केले. नगरसेविका तेजस्विनी नेने यांचेही समयोचित भाषण झाले. याचवेळी त्यांनी पर्यावरणाबाबतचा संदेशदेखील दिला. रिमा सावंत यांनी युवकांनी नैराश्याने आत्महत्येचा मार्ग न अवलंबिता देशासाठी बलिदान करण्यासाठी स्वतःचा सिद्ध करावे, असे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिमा सावंत यांनीच केले. आभार रामचंद्र प्रतिष्ठानच्या संचालिका नयना शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास विविध वयोगटातील मंडळी उपस्थित होती.